सुपर हिरो अँटीजन...!!!

Foto
तब्बल ५० हजार  टेस्ट किट आज होणार शहरात दाखल !
अवघ्या अर्ध्या तासात कोरोनाचा रिपोर्ट देणाऱ्या अँटीजन टेस्टची मोठी चर्चा शहरवासीयांमध्ये आहे. टेस्ट दिल्यानंतर तब्बल २४ तास तळमळत राहणारे रुग्ण, नातेवाईकांची धाकधूक आणि भीती आता केवळ अर्ध्या तासावर आली आहे. त्यामुळे अँटीजन टेस्ट सुपरहीरो ठरू लागली आहे.
कोरोना शब्द उच्चारताच हातपाय गळून जातात. शहराला तर संसर्गाचा विळखाच पडला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक जण भीतीच्या सावटाखाली आहे. त्यातच कोरोना संशयितांची होणारी हेळसांड न पाहणारीच. टेस्ट दिल्यापासून ते अहवाल येईपर्यंतचा कालावधी रुग्णांसाठी मानसिक मरणयातनाच असतात.  दुसरीकडे सामाजिक अवहेलना ही वाट्याला येते.  अहवाल येण्याचा कालावधी आतापर्यंत तब्बल २४ तासांचा होता. या कालावधीत रुग्ण अक्षरश: भीतीनेच खचून जात असे. कुटुंबाची अवस्था न पाहण्या सारखीच होती. तर तपासणी केल्यानंतर रुग्णाला क्वारान्टीन व्हावे लागेल या भीतीने अनेकजण टेस्ट करण्यासाठी पुढे येत नव्हते. अनेकांनी अंगावरच तापेचे दुखणे सहन केले. त्यामुळे असे रुग्ण गंभीर अवस्थेत पोहोचल्याची उदाहरणे ताजी आहेत. अशा भीतीदायक वातावरणात रुग्ण टेस्ट साठी पुढे येतच नव्हते.
आला सुपरहिरो...!
 आता मात्र ही भीती संपली आहे. अवघ्या अर्ध्या तासात रिपोर्ट देणारी यंत्रणा कालपासून शहरात सुरू झाली. या नव्या पद्धतीत कोरोनाचा अहवाल अवघ्या अर्ध्या तासात येतो. त्यामुळे रुग्णाला कुठेही क्वारंटाईन होण्याची आवश्यकता नाही. पॉझिटिव्ह अहवाल आला तर थेट रुग्णालयात निगेटिव्ह आला तर सरळ घरी असा हा प्रकार आहे. त्यामुळे अतिशय सोपी आणि सुलभ ही प्रक्रिया झाल्याचा दावा आरोग्य अधिकारी करीत आहेत.

घाबरण्याची मुळीच गरज नाही : डॉ. पाडळकर 
दरम्यान घाटीच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी सांगितले की, मनपाला साडेचार हजार अँटीजन किट प्राप्त झाल्या होत्या या किट मुळे केवळ अर्ध्या तासात अहवाल येतो. रुग्णाला कुठेही दाखल होण्याची गरज नाही. जर पॉझिटिव्ह आला तर मात्र उपचारासाठी आरोग्य रुग्णालयात दाखल व्हावे लागेल. निगेटिव आला तर काळजीच मिटली. त्यामुळे कुणालाही आता एक-दोन दिवस ताटकळत राहण्याची आवश्यकता नाही. आपला आजार अंगावर मुळीच काढू नका. नव्याने ५० हजार अँटीजन किट शहरात दाखल होणार आहेत.

यंत्रणेवरील मोठा ताण कमी झाला : डॉ. सुंदर कुलकर्णी 

यापूर्वी कोरोना टेस्टचा अहवाल येण्यासाठी एक दिवसाचा कालावधी लागत असे. या काळात रुग्णांची होणारी तळमळ न पाहवणारी होती. त्याचबरोबर इन्स्टिट्यूशनल, होम क्वारान्टीन यातही मोठा कालावधी जात  होता. आता मात्र अँटीजन टेस्ट मुळे रुग्णाचा अहवाल अर्धा तासात येतो. त्यामुळे रुग्णही टेस्ट साठी आता घाबरत नाहीत.  आता कोणीही आजार अंगावर काढण्याची गरजच उरली नाही. आरोग्य यंत्रणेचेही काम काहीसे सोपे झाले आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन डॉ. कुलकर्णी यांनी केले.
५० हजार सुपर हिरो आज येणार !
 दरम्यान राज्य शासनाने मनपाला देऊ केलेल्या ५० हजार अँटीजन कीट आज संध्याकाळपर्यंत शहरात दाखल होणार आहेत. पहिल्या टप्प्यात मनपाला केवळ ४६०० किट मिळाल्या होत्या. यापैकी काल जवळपास १९४७ कीट वापरण्यात आल्या. तर आज दिवसभरात दोन ते अडीच हजार किट वापरल्या जाणार आहेत. मात्र उद्या नव्या किटची आवश्यकता भासणार आहेत.   याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून मुंबईहून आज संध्याकाळपर्यंत ५० हजार किट शहरात दाखल होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.